Motivational poem in Marathi

 1. स्री म्हणजे खेळणं नव्हे


खेळत आईच्या मांडीवर

वाढले मी लाडात राणी

लागले चालू दुडुदुडु अंगणी

तेव्हा झाले होते मी खेळणं

फक्त माझ्याच आईबाबांसाठी....


टाकले पाऊल समाजात सहजच

दिसत होते बाहुलीसारखी छान

वाटलं नव्हतं खरंच खेळणं बनेन

शंका मनातली सत्यात ऊतरली

संतापाची लकेर मस्तकात घुसली


सांगावे वाटले ओरडून जगाला

अरे!! स्त्री म्हणजे खेळणं नव्हे

आहेत तिलाही भावना अन्..

आहे सुंदर हळवं मनसुद्धा

विचार करा रे त्याचाही तुम्ही

बंद करा तुमच्या वासनांध नजरा..



नाही व्हायचं मला खेळणं कुणाचं

शिकायचयं प्रतिकार करायला ...

अकारण होणाऱ्या अन्यायाविरुद्ध

मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीविरुद्ध.

बनवायचयं सक्षम मला करण्या

उद्धार स्वतःचाच..

पाडण्या मुडदे अत्याचाऱ्यांचे



2. शिव छत्रपती


रयतेचा राजा थोर

शिवराय छत्रपती

आदर्शांचा परिपाक

सुप्रसिध्द राजनिती।


चेतविला स्वाभिमान

धन्य माऊली ती जीजा

वीर रक्त प्रकटते

धन्य पिता शहाजी राजा।


कावा तो गनिमी

धुव्वा शत्रूचा रणी

धाडसाचे बाळकडू

जणू वाघ रणांगणी।


शूर वीर घडविले

ध्येय स्वराज्य पुजिले

निर्णायक,धुरंधर

तत्व अंगी बाणियले।


स्वराज्याच्या प्रतिज्ञेला

देवालय स्वयंभूचे

रक्त तिलक करुनी

मागे दान स्वराज्याचे।


शायिस्त्या, अफजलाचा काळ

धुळीस मिळवला गनिम

औरंगजेबाला दिली मात

इच्छाशक्ती धुर्त अदिम।


गडकिल्ले मजबूत

स्वराज्याचे ते रक्षक

शिवबांनी वर्धित केले

भक्कम तट संरक्षक।


माता भगिनींचा बंधू

रयतेचा दैवी त्राता

दातृत्व जगती प्रसिध्द

मावळ्यांचा पालनकर्ता।


असा राजा पुन्हा होणे

शक्य नाही इतिहासात

लाखो,देशवासियांच्या

शिवराय वसले मनामनात.




3. ती शिवबाचा बाणा, ती कुसुमाग्रजांचा कणा

जीव जाईपर्यंत धाडस देणारी ती म्हणते,फक्त लढ म्हणा


ती गोंडस बाळाचा ळ आहे, ती अर्जुनाच्या बाणांचा ण आहे

ती अन्यायाविरुद्ध लढण्याऱ्या प्रत्येक क्षत्रियाचा क्ष आहे


ती गुढ्यांचा पाडवा आहे, ती संक्रांतीचा गोडवा आहे

ती वर्तमानपत्रातील शब्दकोड्यांचा तोडगा आहे


ती जिजाऊंची हिम्मत आहे, ती अत्रेंची गंमत आहे

ती शब्दांवर ओघळणाऱ्या कवितेची किंमत आहे...!




4.  आई

जन्माला आलो तुझ्या पोटी,

लाभिले पुण्य आत्मीय कोटी,

अनाथ्याला सनाथ केलेस,

का, फाटक्या झोळीला मायेने वीणलेस ?


भाग्य घेयूनी आलो या धरेवर,

आधार देयूनी नेलेस मला उंचीवर,

मला जेवुनिया राहिलीस तू उपाशी,

का, इतके प्रेम बागळतेस मजसाठी उराशी ?


कृष्णिय साथ लाभिली होती पार्थ,

तुझ्याच कष्टामुळे झालो मी सार्थ,

सागरी अंगावर खोडकर लाटा उसळी,

का, नेत्री मजसाठी अश्रु तुझे कोसळी ?


अमूल्य आयुष्य जिथे ठेवतात जपुनिया,

श्रीमंत केलेस मज ते वेचुनिया,

खंबीरपणे लेकरू तुझा आहे जगात उभाची

का, दिलेस तोंड वादळी एकटी तयाची ?

जळूनीया स्वतः केलेस जीवनी प्रकाश,

पंख लावूनी तुच तर दखविलेस आकाश,

घर–पणाला लागतो भक्कम तुझा पाया,

का, दिलेस या वासरूस अनंत छाया ?


गरिबीला माझ्या केलेस तू निंदनीय,

तुझ्याशिवाय नाही कोणी वंदनीय,

कलियुगी ‘सुजाता’ रूपी जन्म घातलेस,

का माझ्या दुख:रथात सारथी झालेस ?


मनुष्य होण्याचे धडे मनी गिरविलेस,

ऋणी आहे तुझा तू मला भरविलेस,

देव असतो-नसतो माहीत नाहीं मला,

का वैकुंठि अनुभव तुझ्या चरणी मज आला ?


निरार्थी शब्दाला अर्थ आणलेस,

निसटलेल्या विश्वासाला एकरूप केलेस,

निस्वार्थ प्रेम जगी तुझेच उरले,

का या अल्पाला बहुतांश मानले ?



भेटलो नाही रामा तरी नाही होणार दु:ख,

तू भेटलीस,आणखीन किती असणार मोठे सुख:,

सदा केलेस धावा माझ्यासाठी त्या साई,

प्रत्येका जन्मी असशील न तू माझी आई ?



5.  कधी थांबेल सांग तुझी वासनेची भूक ?

कधी स्त्रीभ्रुणावर अत्याचार

जन्माआधीच मरणयातना

जन्म पूर्वीच मिटवलस

वासना तुझी कधी संपेल ?


कधी थांबेल सांग तुझी वासनेची भूक ?

कधी तान्हा बालिकेवर अत्याचार

तुला आता तान्ह बाळ पुरेना

डोळे उघडया आंतच मिटवलीस

वासना तुझी कधी संपेल ?


कधी थांबेल सांग तुझी वासनेची भूक ?

निरागस बालिका वर अत्याचार

कुचकरून कोवळ्या कळयांना

फुलव्या आंतच मिटवलस

वासना तुझी कधी संपेल ?


कधी थांबेल सांग तुझी वासनेची भूक ?

रोज होत आहेत नारीवर अत्याचार

बळी झाली तुझ्या वासनांना

वासना भागून रस्त्यावर फेकलस

वासना तुझी कधी संपेल ?


कधी थांबेल सांग तुझी वासनेची भूक ?

रोज होतात अबला ,सबला बालिकेवर अत्याचार

तुला आता पोटची पोर सुध्दा पुरेना

माणूसकीच तु .मिटवलीस

वासना तुझी कधी संपेल ?


कधी थांबेल सांग तुझी वासनेची भूक ?

का कधी संपनारच नाही का तुझी भूक

असेच होत राहतील अत्याचार

एक दिवस जन्म घ्यायला आई सुध्दा नाही उरणार

सांग तुझ्यातला राक्षस कधी मरणार?







Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Love poem in Marathi

Inspirational poem in English